६५ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित पूरग्रस्त वसाहतींचा प्रश्न मार्गी; पानशेत पूरग्रस्त समितीकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जाहीर सत्कार
पुणे : कोथरूड येथे जवळपास ६५ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या पूरग्रस्त वसाहतींच्या मालकी हक्क आणि नियमितीकरणाच्या ऐतिहासिक प्रश्नाला अखेर यश आले आहे. हा अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न यशस्वीपणे मार्गी लावल्याबद्दल पानशेत पूरग्रस्त समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोथरूडचा लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करताना मला मनापासून आनंद आणि समाधान वाटत आहे. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला हा संवेदनशील प्रश्न सोडवून हजारो पूरग्रस्त कुटुंबांना त्यांचा हक्क व न्याय मिळवून देणे, हे माझ्या सार्वजनिक जीवनातील अत्यंत समाधानकारक कार्य आहे.
गेली अनेक वर्षे आपल्या हक्काच्या मालकीसाठी संघर्ष करणाऱ्या पूरग्रस्तांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यापुढेही कोथरूड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी, स्थानिक नागरिकांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि जनतेच्या हितासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, अशी खंबीर ग्वाही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निमित्ताने कोथरूडकरांना दिली.
या कार्यक्रमास खासदार मेधा कुलकर्णी, राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष माधव भंडारी, प्रभाग अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक पुनीत जोशी, सुनील पांडे, पूरग्रस्त समितीचे पदाधिकारी तसेच कोथरूडमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.