कोथरुडमध्ये वारकऱ्यांना पारमार्थिक साहित्याचे वाटप; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक घेतले वारकरी माऊलींचे दर्शन

9

पुणे : आषाढी वारी आणि वारकरी संप्रदाय ही आपल्या महाराष्ट्राची विस्तीर्ण सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख आहे. दरवर्षी जून महिना उजाडला की, तमाम वारकरी बांधवांना आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनाचे वेध लागतात,” अशा भावना व्यक्त करत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमध्ये वारकरी बांधवांसाठी विशेष सेवा उपक्रम राबवला. पंढरीच्या पावन वाटेवर निघालेल्या वारकरी माऊलींचा हा भक्तीप्रवास सुसह्य आणि सुखकर व्हावा, या प्रामाणिक हेतूने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही कोथरुडमध्ये वारीसाठी आवश्यक असणारे सर्व पारमार्थिक साहित्य वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले

या मंगलमयी प्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील यांना पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकरी माऊलींचे सहपत्नीक दर्शन घेण्याचे, त्यांची मनोभावे पाद्यपूजा करण्याचे आणि त्यांच्या सेवेत प्रत्यक्ष सहभागी होण्याचे परमभाग्य लाभले. वारकऱ्यांच्या भक्तीने संपूर्ण कोथरुड परिसर विठ्ठलमय झाला होता.

याप्रसंगी बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, “ही छोटीशी सेवा मी विठूरायाच्या आणि माझ्या वारकरी माऊलींच्या चरणी समर्पित करतो. पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या सर्व वारकरी बांधवांचा हा भक्तीप्रवास मंगलमय आणि सुखकर होवो, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना!” या उपक्रमामुळे कोथरुडमधील वारकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.