पुणेकरांची भावना लक्षात घेऊन, माननीय अनुरागजी सकारात्मक निर्णय घेतील, चंद्रकांत पाटलांचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांना पत्र
पुणे : पुण्यातील आकाशवाणी केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करुन त्यावरील बातमीपत्रांचे छत्रपती संभाजीनगरला स्थलांतर करण्याचा निर्णय प्रसार भारतीकडून घेण्यात आल्यानंतर पुणेकरांनी याबाबत नाराजी दर्शविली. प्रसार भारतीने याबाबतचा लेखी आदेश जारी केला असून येत्या १९ जून पासून पुणे आकाशवाणी बंद करण्यात येणार असल्याची माहिती प्रसार भारतीने दिली आहे. पुणे विभागाच्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्राची जबाबदारी छत्रपती संभाजीनगर येथील वृत्त विभागाकडे दिल्याची माहिती देण्यात आली.

पुणेकरांच्या भावना विचारात घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्र लिहून सदर निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी विनंती केली आहे. याबाबत आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पाटील म्हणतात “आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करुन त्यावरील बातमीपत्र छत्रपती संभाजीनगरला स्थलांतरीत करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला आहे. सदर निर्णयाचा पुनर्विचार करुन बातमीपत्र स्थलांतरित करण्यास स्थगिती द्यावी यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून विनंती केली आहे. पुणेकरांची भावना लक्षात घेऊन, माननीय अनुराग जी सकारात्मक निर्णय घेतील, याचा मला विश्वास आहे.”