पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. या ग्रंथ मेळ्यामुळे वाचनप्रेमींना एक अनोखी पर्वणीच लाभली आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने एक अनोख्या ठेवीचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले, असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रंथ मेळा आयोजित केला आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (एनबीटी) च्या वतीने आयोजित ‘पुणे पुस्तक महोत्सवात’ देशभरातील विविध भाषांमधील पुस्तकांची प्रदर्शनी भरवण्यात आली आहे. या ग्रंथ मेळ्यामुळे वाचनप्रेमींना एक अनोखी पर्वणीच लाभली आहे. या मेळ्याच्या निमित्ताने एक अनोख्या ठेवीचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. ती ठेव म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या, भारत मातेच्या वीर सुपुत्र शहीद भगतसिंग यांनी कारागृहात लिहिलेली डायरी! ही डायरी म्हणजे आपल्या स्वातंत्र्यसमराच्या महायज्ञातील एक ग्रंथच म्हणावा लागेल.
पाटील पुढे म्हणाले कि, या ग्रंथाच्या दर्शनाने अंगावर रोमांच उभे राहिले, क्षणभर भावुक झालो. एका थोर हुतात्म्याच्या हस्तस्पर्शाने पावन झालेल्या डायरीच्या दर्शनाने कृतार्थ झालो, असल्याचे पाटील म्हणाले.