‘गणपती तुमचा, किंमतही तुमचीच’ उपक्रमाचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ; प्रल्हाद गवळी यांच्या लोककल्याण प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम
पुणे : पुण्यातील प्रत्येक कुटुंबाला आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत आनंदाने, उत्साहाने आणि कोणत्याही आर्थिक विवंचनेशिवाय करता यावे, या भावनेतून भाजप नेते प्रल्हाद गवळी यांच्या लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून ‘गणपती तुमचा, किंमतही तुमचीच’ हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे. या अभिनव उपक्रमाचा भव्य शुभारंभ राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्तींच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडू नये, म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये भाविक आपल्या इच्छेनुसार आणि क्षमतेनुसार कोणतीही किंमत देऊन बाप्पाची मूर्ती घरी नेऊ शकतात. गणेशमूर्ती सर्वसामान्यांच्या आवाक्यात उपलब्ध करून देत ‘गणपती बाप्पा मोरया’चा उत्सव प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा हा एक अत्यंत सुंदर आणि कौतुकास्पद प्रयत्न असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून गणेशभक्तांच्या आनंदात सहभागी होताना मनापासून समाधान वाटल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमामुळे पुण्यातील हजारो मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रल्हाद गवळी आणि लोककल्याण प्रतिष्ठानच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या प्रसंगी प्रल्हाद गवळी, दगडूशेठ मंडळाचे अध्यक्ष सुनील रासने, नगरसेविका कल्पनाताई भैरट, नगरसेवक नामदेव माळवदे, भाजप नेत्या वैष्णवी किराड, प्रमोद कोंढरे, जीवन गायकवाड, विकास गवळी, विक्रम लगड, हेमंत कंठाळे यांच्यासह मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.