श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या चरणी मंत्री चंद्रकांत पाटील नतमस्तक; सपत्नीक घेतले दर्शन
पुणे : पुण्याच्या गणेशोत्सवाची ऐतिहासिक आणि क्रांतिकारी परंपरा अविरतपणे जपणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाच्या श्रीगणेशाचे आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांनी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे आरती केली आणि आशीर्वाद घेतले.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणाऱ्या आणि पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू असलेल्या या ऐतिहासिक मंडळाला भेट दिल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले. दर्शन सोहळ्यानंतर त्यांनी मंडळाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन तसेच मंडळाच्या इतर सर्व पदाधिकाऱ्यांशी व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. ऐतिहासिक परंपरा जपत अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात उत्सव साजरा केल्याबद्दल त्यांनी मंडळाचे कौतुक केले व सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
“विघ्नहर्त्या गणरायाची कृपादृष्टी महाराष्ट्रातील जनतेवर सदैव राहो आणि बाप्पाच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराट नांदो,” अशी प्रार्थना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बाप्पाच्या चरणी केली. याप्रसंगी मंडळाच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.