‘पुणे मेयर्स ट्रॉफी’ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा थरार; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

4

पुणे : पुण्याच्या क्रीडा वैभवात भर घालणाऱ्या ‘योनेक्स-सनराईज इंडिया ज्युनियर इंटरनॅशनल ग्रँड प्रिक्स २०२६ – पुणे मेयर्स ट्रॉफी’ या अत्यंत प्रतिष्ठित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष भेट दिली . यावेळी त्यांनी काही वेळ थांबून प्रत्यक्ष सामन्यांचा आणि युवा खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळाचा मनसोक्त आनंद लुटला.

बॅडमिंटन क्षेत्रातील दिग्गज दिवंगत सुशांत चिपलकट्टी यांच्या स्मृतींना समर्पित असलेल्या या मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून देशभरातील तसेच जगातील प्रतिभावान युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्रीडा गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आणि महत्त्वाचे जागतिक क्रमवारी गुण मिळविण्यासाठी एक हक्काचे व दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. ही पुण्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी नमूद केले.

पुण्याच्या ऐतिहासिक क्रीडा परंपरेला साजेसे असे या स्पर्धेचे अत्यंत नेटके आणि भव्य आयोजन होत असल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले. या सोहळ्याप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते स्पर्धेतील अंतिम विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंचा मेडल व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला . तसेच, या युवा क्रीडापटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत त्यांच्या पुढील आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रवासासाठी आणि वाटचालीसाठी त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याला पुणे महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी, बॅडमिंटन असोसिएशनचे पदाधिकारी, प्रशिक्षक आणि शेकडो क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, आयोजक अनिरुद्ध देशपांडे, रणजीत नातू यांच्यासह विविध मान्यवर आणि देशभरातून आलेले युवा खेळाडू उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.