खासदार जनसंपर्क सेवा अभियान’च्या चौथ्या टप्प्याची कोथरूडमधून दमदार सुरुवात; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत रंगला ‘जनता दरबार’

4

पुणे : निवडणूक संपली तरी जनतेशी असलेले नाते संपत नाही, उलट जनतेच्या अपेक्षा आणि प्रश्नांची जबाबदारी अधिक दृढ होते. नागरिकांना केवळ आश्वासन न देता त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीपर्यंत प्रशासनासोबत समन्वय साधत काम करणे, हीच या अभियानामागची मुख्य भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले . केंद्रीय सहकार आणि विमानचालन राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने आयोजित ‘खासदार जनसंपर्क सेवा अभियान’ अंतर्गत कोथरूड विधानसभा मतदारसंघात भव्य ‘जनता दरबाराचे’ आयोजन करण्यात आले होते. या विशेष प्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधला.

या जनता दरबाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. यामुळे कोथरूड परिसरातील नागरिकांच्या अनेक स्थानिक प्रश्नांवर तातडीने जागेवरच कार्यवाही करण्यात आली, तर मोठ्या प्रलंबित विषयांच्या निराकरणासाठी संबंधित विभागांकडे तात्काळ पाठपुरावा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना, सेवा आणि सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना त्याचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी या अभियानात विशेष मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले होते.

या अभियानादरम्यान कोथरूडमधील शेकडो माता-भगिनींनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना प्रेमाने राखी बांधून रक्षाबंधनाचा स्नेहाचा धागा अधिक घट्ट केला, हा क्षण मनाला विशेष भावल्याची भावना मंत्री पाटील यांनी व्यक्त केली. कोथरूडच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

या भव्य जनसंपर्क अभियानाला पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषाताई नागपुरे, उपमहापौर परशूराम वाडेकर यांच्यासह शहरातील विविध प्रभागांचे माजी नगरसेवक, भाजपा कोथरूडचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे अभियान यशस्वी करण्यासाठी अहोरात्र योगदान देणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि आपल्या समस्या घेऊन उपस्थित राहिलेल्या शेकडो नागरिकांचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.