‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवनगौरव’ पुरस्कार राज्याचे माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान

5

सातारा : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवारी सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिक्षण हेच कर्म अन समाजसेवा हाच धर्म मानणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. यानंतर ‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव’ पुरस्काराचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राज्याचे माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना प्रदान करण्यात आला.

ॲड. कुंभकोणी यांची इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड होऊन प्रदान होत असल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे, असे पाटील यांनी यावेळी सांगितले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘कमवा व शिका’ योजना त्यांच्या शिक्षण संस्थेत सुरू केली. यामुळे मुले स्वाभिमानाने शिक्षण घेऊ लागली. त्याचबरोबर त्यांनी वसतिगृहे निर्माण करून मुलांच्या शिक्षणाबरोबर राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालयांमध्ये सुमारे चार लाख ५२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही संस्था आशियातील सर्वात मोठी संस्था आहे.
ॲड. कुंभकोणी यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून रयत शिक्षण संस्थेला पाच लाख रुपयांची देणगीही यावेळी दिली.या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेमधील अधिकारी कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हॉइस चेअरमन भगीरथ शिंदे, संघटक अनिल पाटील, कायदे सल्लागार दिलावर मुल्ला, सचिव विकास देशमुख आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.