कोल्हापूर दौऱ्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले विविध गणेश मंडळांसह महागणपतीचे दर्शन; सुख-समृद्धीचे घातले साकडे
कोल्हापूर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी, १९ सप्टेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर होते. गणेशोत्सवाच्या या मंगलमय आणि भक्तीमय वातावरणात त्यांनी कोल्हापूरमधील विविध गणेश मंडळे, ऐतिहासिक महागणपती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी विराजमान बाप्पाचे अत्यंत भावपूर्ण दर्शन घेतले.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या निवासस्थानी भेट देऊन तेथे विराजमान झालेल्या लाडक्या श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले आणि बाप्पाची विधिवत पूजा-अर्चा केली. विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होत, गणरायाची कृपादृष्टी सर्वांवर सदैव राहो आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
आपल्या दौऱ्यात पुढे त्यांनी कोल्हापूरकरांच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे मुख्य केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ऐतिहासिक महागणपतीचे अतिशय भक्तिभावाने दर्शन घेतले. भर चौकात सजलेल्या या भव्य महागणपतीच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी संपूर्ण कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी साकडे घातले.यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमधील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन तेथील श्री गणरायाचे दर्शन घेतले.
बाप्पाच्या आगमनाने कोल्हापूर नगरीत निर्माण झालेला भक्तिमय उत्साह आणि प्रत्येक मंडळातील कलात्मक व सुंदर सजावट मन प्रसन्न करणारी होती, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. श्री गणेशाच्या आशीर्वादाने कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रावर सुख-समृद्धीची कृपाछाया सदैव राहो, अशी मनोभावे प्रार्थना त्यांनी दौऱ्याच्या शेवटी केली.