लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार यादी शुद्धीकरणाची ही मोहीम अत्यंत महत्त्वाची – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आणि पक्ष पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियान आढावा बैठक पार पडली.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘मन की बात’ कार्यक्रम, पदवीधर मतदार नोंदणी, शिक्षक मतदार नोंदणी तसेच डिजिटल प्रशिक्षण या विषयांचाही आढावा घेण्यात आला. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून बूथचे एकत्रीकरण, बूथ बैठका, आगामी कार्यक्रम आणि प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यास मोठी मदत होत असल्याचेही यावेळी पाटील यांनी नमूद केले.
पाटील पुढे म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार यादी शुद्धीकरणाची ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असून, प्रशासनाने ३० जुलैच्या अंतिम मुदतीपूर्वी याची तातडीने व अचूकतेने अंमलबजावणी करावी. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यावर होणारी नागरिकांची धावपळ टाळण्यासाठी आगामी २० दिवसांत, विशेषतः शनिवार आणि रविवारी विशेष ड्राईव्ह राबवून प्रत्येक पात्र नागरिकाचा फॉर्म वेळेत भरून घेणे आवश्यक आहे. या प्रक्रियेचे दूरगामी राजकीय व सामाजिक परिणाम पाहता, प्रशासनाने संपूर्ण मोहीम गांभीर्याने आणि पारदर्शकतेने राबवावी अशा सूचना यावेळी पाटील यांनी दिल्या.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, माजी प्रदेश सचिव महेश जाधव, राहुल चिकिडे, विराज चिखलीकर, अमर साठे, विशाल शिराळे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ पदाधिकारी, बीएलए-२ आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.