केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पोलीस ग्राऊंड सभास्थळाची पाहणी; जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक
कोल्हापूर : केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शहा यांच्या १९ व २० जून रोजी होणाऱ्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस ग्राऊंड येथील सभास्थळाची पाहणी करून विविध तयारीचा आढावा घेतला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नियोजन बैठकीत सहभागी होत प्रशासनातील विविध विभागांशी सविस्तर चर्चा केली.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सभास्थळी नागरिकांची बैठक व्यवस्था, सुरक्षा, वाहतूक नियोजन, प्रवेश-निर्गमन मार्ग, वाहनतळ तसेच आवश्यक सुविधांची पाहणी करून संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या. अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान सर्व कार्यक्रम सुयोग्य, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावेत यासाठी प्रशासन आणि पक्ष संघटना यांच्यात प्रभावी समन्वय ठेवण्यावर भर दिला.
कोल्हापूर जिल्ह्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असून मोठ्या प्रमाणावर जनसहभाग अपेक्षित आहे. प्रत्येक व्यवस्था उत्कृष्ट पद्धतीने उभारून हा दौरा आणि सभा यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत, असे पाटील यांनी म्हटले.