जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये ‘विश्वशांतीसाठी णमोकार महामंत्र’ कला प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन; आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई : कला, अध्यात्म आणि विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या ‘विश्वशांतीसाठी णमोकार महामंत्र’ या विशेष कला प्रदर्शनाचे उद्घाटन आज मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबळे यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रसिद्ध चित्रकार जैन कमल यांच्या कलाकृतींवर आधारित या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
२६ मे ते १ जून २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन कला रसिकांसाठी खुले राहणार असून, कला आणि अध्यात्माचा सुंदर संगम अनुभवण्याची ही उत्तम संधी असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. जैन कमल यांनी आपल्या कुंचल्यातून णमोकार महामंत्राची अक्षरे, त्यामागील आध्यात्मिक भावना आणि जागतिक शांततेचा संदेश कॅनव्हासवर अतिशय सुंदर रीतीने साकारला आहे.
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, श्री मयूर महाराज साहेब, आचार्य श्री नयनसागर महाराज, विविध क्षेत्रातील मान्यवर, कला रसिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच जैन समाजातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.