दर्जेदार शिक्षणासोबतच दर्जेदार निवासावर शासनाचा भर; वांद्रे येथे ‘सर जे. जे. कला संस्था वसतिगृहाच्या’ भव्य नव्या इमारतीची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहणी

12

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी वसतिगृहामध्ये आधुनिक आणि सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. याच ध्येयाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त वसतिगृह उभारण्यावर शासनाचा मुख्य भर आहे, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

वांद्रे पूर्व येथील कलानगर परिसरात वेगाने सुरू असलेल्या ‘सर जे. जे. कला संस्था वसतिगृहाच्या’ नव्या इमारतीच्या बांधकामाची चंद्रकांत पाटील यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. आणि कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणीदरम्यान त्यांनी बांधकामाची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच कामाच्या गुणवत्तेबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली व काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

नव्या वसतिगृहाची वैशिष्ट्ये आणि आधुनिक सुविधा:
विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा आणि आरामदायी निवास लक्षात घेऊन या वसतिगृहाचे अत्यंत नेटके नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने खालील सुविधांचा समावेश आहे:

प्रवेश क्षमता: या आधुनिक वसतिगृहामध्ये एकूण १००० विद्यार्थ्यांची (५०० विद्यार्थी आणि ५०० विद्यार्थिनी) निवास क्षमता असेल.
खोल्यांची रचना: वसतिगृहात एकूण ३६४ स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये मुलांसाठी १८२ आणि मुलींसाठी १८२ खोल्या राखीव आहेत.

खोलीतील सुविधा: प्रत्येक खोलीत तीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कॉट आणि कपाटाची सुविधा दिली आहे. तसेच प्रत्येक खोलीला स्वतंत्र प्रसाधनगृह (अटॅच बाथरूम) जोडण्यात आले असून त्यात गिझरद्वारे गरम पाण्याची सोय असेल.

इतर सोयी: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वसतिगृह परिसरात सुसज्ज वाचन कक्ष, जिम (व्यायामाळा), इनडोअर प्ले एरिया, डबल हाईट कॉमन रूम, वार्डन रूम आणि प्रत्येक मजल्यावर शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.

“विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि राहण्यासाठी उत्तम वातावरण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. हे वसतिगृह मुंबईत शिकणाऱ्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी एक आधुनिक आणि सुरक्षित हक्काचे घर ठरेल.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी तंत्र शिक्षण सहसचिव संतोष खोरगडे, अवर सचिव प्रवीण मुंढे, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, उपकला संचालक विनोद दांडगे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी आणि संबंधित उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.