इचलकरंजीमध्ये ‘नूतन वैद्यकीय निदान केंद्रा’चे लोकार्पण… संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते उद्घाटन; मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
कोल्हापुर : इचलकरंजी येथे सेवा भारती संचलित नूतन वैद्यकीय निदान केंद्र व दंत चिकित्सा केंद्राचा उद्घाटन सोहळा रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक आदरणीय नानासाहेब जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सेवा भारतीच्या या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या.
‘सेवा परमो धर्म:’ या ब्रीदवाक्याला स्मरून आरोग्य क्षेत्रात सुरू झालेला हा उपक्रम सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांसाठी मोठा आधार ठरेल, असा मला ठाम विश्वास असल्याचे प्रतिपादन यावेळी पाटील यांनी केले.

या केंद्रात प्रगत वैद्यकीय निदान यंत्रणा आणि दंत चिकित्सेची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने सेवा भारतीने हे पाऊल उचलले आहे. नानासाहेब जाधव यांनी आपल्या भाषणातून या केंद्राच्या माध्यमातून निस्वार्थी सेवा घडेल, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी विभाग संघचालक आप्पासाहेब दड्डीकर, सहसंघचालक आणि सेवा भारतीचे भगतरामजी छाबडा, इचलकरंजीचे उपमहापौर अनिल डाळ्या, डॉ. श्रीवल्लभ मर्डा, मिलिंद मुरगुंडी, एफआयई ग्रुपचे अमोदजी कुलकर्णी व असिम कुलकर्णी, डॉ. राजेश पवार, एसने आण्णा यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.