AISSMS संस्थेचा विस्तार आणि त्यांची सामाजिक बांधिलकी पाहता, मुलींसाठी अद्ययावत वसतिगृह उभारण्याचा हा संकल्प अतिशय कौतुकास्पद – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पुण्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असलेल्या ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी (AISSMS) च्या वतीने उभारण्यात येणाऱ्या मुलींच्या नवीन वसतिगृहाचा भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. राज्यातील शैक्षणिक संस्थांनी केवळ दर्जेदार शिक्षणच नव्हे, तर ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी २४ तास सुरक्षित वातावरण असलेले निवासस्थान उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. AISSMS संस्थेचा विस्तार आणि त्यांची सामाजिक बांधिलकी पाहता, मुलींसाठी अद्ययावत वसतिगृह उभारण्याचा हा संकल्प अतिशय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले.

राज्य सरकारने घेतलेल्या मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाच्या निर्णयामुळे आज महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. महानगरात शिक्षणासाठी येणाऱ्या या लेकींना राहण्याची उत्तम सोय मिळावी, यासाठी शासन देखील निर्वाह भत्ता योजनेच्या माध्यमातून सातत्याने मदत करत आहे. हे नवीन वसतिगृह ग्रामीण भागातील कष्टकरी कुटुंबातील मुलींच्या स्वप्नांना नवी उभारी देईल, असा मला ठाम विश्वास असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.
याप्रसंगी खासदार आणि संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री शाहू छत्रपती, सचिव मालोजीराजे छत्रपती, सहसचिव सुरेश शिंदे, खजिनदार अजय पाटील, नियामक मंडळ अध्यक्ष व्ही. बी. पाटील, कारभारी मंडळ अध्यक्ष ॲड. भगवानराव साळुंखे यांच्यासह संस्थेचे इतर पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.