मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून माजी सैनिक वसंतराव साखळकर आणि प्राचार्या शुभांगी गावडे यांना श्रद्धांजली
सांगली : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यादरम्यान सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांच्या निवासस्थानी जाऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते सतिश साखळकर यांचे वडील आणि माजी सैनिक वसंतराव दत्तात्रय साखळकर यांचे नुकतेच निधन झाले. चंद्रकांत पाटील यांनी साखळकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन कै. वसंतराव यांना श्रद्धांजली वाहिली आणि साखळकर कुटुंबाचे सांत्वन केले.
यावेळी उत्तम साखळकर, अमर पडळकर, महेश खराडे, सुनील भोसले, केदार खाडिलकर आदी उपस्थित होते. “देशसेवेचा वारसा लाभलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या जाण्याने साखळकर कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगीजी मुरलीधर गावडे यांच्या निधनाचे वृत्त समजताच मंत्री पाटील यांनी कोल्हापूर येथील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. डॉ. बापूजी साळुंखे यांनी सुरू केलेला ‘ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार’ हा शिक्षणाचा वारसा शुभांगीजींनी अत्यंत सक्षमपणे पुढे नेला, अशा शब्दांत त्यांनी शुभांगीजींच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
या दोन्ही ठिकाणी मंत्र्यांनी ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना केली.