बाणेर-बालेवाडीतील वीज समस्येची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून गंभीर दखल; महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली तातडीची आढावा बैठक
पुणे : बाणेर-बालेवाडी परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची गंभीर दखल घेत, शनिवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूड येथील निवासस्थानी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. नागरिकांना अखंडित आणि गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, अशा स्पष्ट सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी भविष्यातील मागणी लक्षात घेऊन बाणेर-बालेवाडी-पाषाण-सूस परिसरातील वीज यंत्रणेचे सक्षमीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन अतिउच्चदाब उपकेंद्राच्या प्रलंबित प्रस्तावासाठी लवकरच ‘महापारेषण’सोबत स्वतंत्र बैठक घेतली जाईल. तसेच, तात्पुरता दिलासा म्हणून NCL केंद्रातून २ नवीन फीडर सुरू करण्याची कामे येत्या ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. रस्ते खोदाई परवानग्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मनपा व महावितरणची संयुक्त बैठक घेतली जाईल. परिस्थिती सुधारेपर्यंत दरमहा नियमित आढावा बैठक घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
या बैठकीला नगरसेविका मयूरी कोकाटे, महावितरणचे गणेशखिंड मंडळाचे अधिक्षक अभियंता सिंहजीराव गायकवाड, शिवाजीनगर विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन शिंदे, कोथरूड विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सामसे, पंडित दांडगे, उमेश उर्पे, भाजप कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर, राहुल कोकाटे, मोरेश्वर बालवडकर,उमाताई गाडगीळ, अनिकेत चांदेरे,निकीता माथाडे तसेच BBPRA (बाणेर, बालेवाडी, पाषाण रेसिडेंस असोसिएशन)चे अध्यक्ष विजय वरणगावकर, सारंगजी वाबळे, संजयजी वाघूलदे, अमेय जगताप, सारंग रानडे यांच्यासह बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.