कोथरुडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांसह पाहिला ‘देऊळ बंद २’ चित्रपट; लेखक-दिग्दर्शक प्रविण तरडे व टीमचे केले अभिनंदन
पुणे :राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमधील नागरिक, कार्यकर्ते आणि स्नेहींसमवेत सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रविण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ हा मराठी चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी या उत्कृष्ट कलाकृतीसाठी लेखक-दिग्दर्शक प्रविण तरडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
चित्रपटाविषयी आपल्या भावना व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतकरी आत्महत्या हा विषय केवळ एका घटकापुरता मर्यादित नसून संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारा आहे. या चित्रपटातून या गंभीर समस्येच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. आपल्या अन्नदात्याला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी सकारात्मक विचार आणि व्यावहारिक मार्ग सुचविण्याचा एक अत्यंत प्रामाणिक प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
चित्रपट हे समाजप्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम आहे, असे स्पष्ट करत मंत्री पाटील यांनी पुढे सांगितले की, सामाजिक भान जपत बळीराजाच्या वेदना, संघर्ष आणि आशा यांचे वास्तववादी चित्रण करणारी ही कलाकृती निश्चितच समाजाला विचार करायला भाग पाडते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ एक समस्या म्हणून न पाहता, त्याकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहण्याचा आणि आपल्या अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश हा चित्रपट देतो. त्यामुळे हा चित्रपट प्रत्येकाने आवर्जून पाहावा, असे आवाहनही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.