भोरचे माजी आमदार आणि राज्याचे माजी मंत्री, ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोर येथे घेतले अंत्यदर्शन
पुणे : भोरचे माजी आमदार आणि राज्याचे माजी मंत्री, ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या निधनाची अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सहकार आणि राजकीय क्षेत्रातील एक झुंजार, निष्ठावंत आणि मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज भोर येथे जाऊन दिवंगत थोपटे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
अनंतराव थोपटे यांनी भोर-वेल्हा-मुळशी या अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागाच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचले. जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या या कार्याचा गौरव करत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, “अनंतराव थोपटे यांनी दुर्गम भागासाठी आणि शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
अंत्यदर्शनानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थोपटे कुटुंबीयांची, आप्तस्वकीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली अनंतरावांची बांधिलकी, साधेपणा आणि लोकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे समाजात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे, असे सांगत त्यांनी ईश्वर चरणी प्रार्थना केली. ईश्वर दिवंगत पुण्यात्म्यास चिरशांती देवो तसेच थोपटे कुटुंबीय आणि असंख्य समर्थकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.