विद्याप्रबोधिनीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गौरव; राष्ट्र उभारणीत योगदान देण्याचे आवाहन

8

पुणे : पुण्यातील विद्याप्रबोधिनी संस्थेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आज विशेष सत्कार सोहळा पार पडला. आपल्या अथक परिश्रमाच्या आणि जिद्दीच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या या विद्यार्थ्यांचा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी मंत्री पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, यशाचा हा टप्पा केवळ एक विक्रम किंवा नोंद नसून, भविष्यातील मोठ्या स्वप्नांकडे वाटचाल करण्याची एक नवी प्रेरणा आहे. विद्यार्थ्यांनी या यशामागील संघर्ष, मेहनत आणि समर्पण नेहमी लक्षात ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञान, संस्कार आणि कर्तृत्वाच्या बळावर समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपले मोलाचे योगदान दिले पाहिजे, अशी अपेक्षा मंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आगामी शैक्षणिक व व्यावसायिक उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

पुण्यातील विद्याप्रबोधिनी या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विविध शैक्षणिक उपक्रम व कोर्सेस राबवले जातात. राज्यसेवा, संयुक्त परीक्षा (PSI/STI/ASO) आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग चालवले जातात . पोलीस भरती आणि तलाठी भरतीसाठी विशेष लेखी व शारीरिक चाचणीच्या बॅचेस घेतल्या जातात. स्पर्धा परीक्षांच्या मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष आयोगाच्या धर्तीवर तज्ज्ञांमार्फत मुलाखतींचे आयोजन केले जाते.

Get real time updates directly on you device, subscribe now.