ISB&M पुणेच्या २५ व्या रौप्य महोत्सवी पदवी प्रदान समारंभास मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती; पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

7

पुणे : पुण्यातील नामांकित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संस्था ‘इंटरनेशनल स्कूल ऑफ बिजनेस अँड मीडिया’ (ISB&M) चा २५ वा रौप्य महोत्सवी पदवी प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या दिमाखदार सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. त्यांच्या हस्ते २०२३-२० Vail या शैक्षणिक वर्षातील यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी पदवीधर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे किंवा उपजीविकेचे साधन नसून समाजपरिवर्तन आणि राष्ट्रनिर्मितीचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, नैतिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी जपणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

ISB&M सारख्या संस्थेतून दर्जेदार शिक्षण घेतलेले हे विद्यार्थी देशाच्या आणि जगाच्या आर्थिक व औद्योगिक प्रगतीला नवी दिशा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज पदवी प्राप्त करणारे तरुण आपल्या अद्ययावत ज्ञान, व्यावसायिक कौशल्य आणि नाविन्यपूर्ण नवकल्पनांच्या बळावर कॉर्पोरेट जगतात व विविध क्षेत्रांत यशाचे नवे मानदंड प्रस्थापित करतील, असे गौरवोद्गारही पाटील यांनी यावेळी काढले.

या प्रसंगी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, इंडियनऑइल अदानी व्हेंचर्स लिमिटेडचे सीओओ डॉ. अतुल खराते, संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रमोद कुमार, सहसंस्थापिका डॉ. सरोजा अस्थाना, डॉ. भीष्मराज श्रीवास्तव यांच्यासह मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.