कोल्हापुरात वि. स. खांडेकर यांच्या भव्य पुतळ्याचे आणि विशेष कलाकृतीचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या ऐतिहासिक वैभवात आणि सौंदर्यात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक पद्मभूषण वि. स. खांडेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या (KSBP) माध्यमातून ‘टाकाळा’ या सुशोभीकृत चौकाचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले. या सोहळ्याप्रसंगी चौकात उभारण्यात आलेल्या वि. स. खांडेकर यांच्या भव्य पुतळ्याचे आणि विशेष कलाकृतीचेही अनावरण करण्यात आले.
या दिमाखदार सोहळ्याप्रसंगी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वारशाचा अभिमान व्यक्त केला. वि. स. खांडेकर यांच्यासारख्या महान साहित्यिकाचे स्मारक कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागात उभारले जाणे, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे पाटील म्हणाले.
कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत (KSBP) टाकाळा चौकाचा पूर्ण कायापालट करण्यात आला आहे. अनावरण करण्यात आलेला वि. स. खांडेकर यांचा पुतळा आणि त्यांच्या साहित्याचा वेध घेणारी विशेष कलाकृती ही या चौकाचे मुख्य आकर्षण ठरत आहे.
या कार्यक्रमाला कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम, शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू प्रा. डॉ. आर. के. कामत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, निलांबरी कुलकर्णी, केएसबीपीचे अध्यक्ष सुजय पित्रे आणि राहुल चिकोडे आदी मान्यवर उपस्थित होते.