वाढदिवसानिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील सपत्नीक करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी नतमस्तक; सुवर्ण कळसाचे घेतले दर्शन
कोल्हापूर : वाढदिवस म्हणजे प्रत्येकाच्या मनाचा एक हळवा कोपराच. नेहमीसारखाच एक दिवस असं कितीही म्हटलं, तरी मनातल्या मनात आयुष्याचा हिशोब सुरू असतो, अशा संमिश्र आणि भावूक भावनांसह राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपला वाढदिवस साजरा केला. या विशेष दिनाचे औचित्य साधून त्यांनी सपत्नीक कोल्हापूरची कुलस्वामिनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंदिरात विधिवत पूजा-अर्चना करून देवी अंबाबाईचे आशीर्वाद घेतले आणि राज्यातील जनतेच्या सुखासाठी, समृद्धीसाठी व कल्याणासाठी मनोभावे प्रार्थना केली. अंबाबाईच्या मंदिरात लाभलेली आध्यात्मिक ऊर्जा आणि लाभलेली मनःशांती नेहमीच अवर्णनीय असते, अशा शब्दांत त्यांनी दर्शनानंतर आपले समाधान व्यक्त केले.
या दर्शनादरम्यान पाटील यांनी अंबाबाई मंदिराच्या नूतन सुवर्ण कळसाचे मनोहारी दृश्य अनुभवले आणि ते डोळ्यांत साठवून घेतले. या सुवर्ण कळसामुळे मंदिराच्या ऐतिहासिक वैभवात मोलाची भर पडली असून, अंबाबाईचे दर्शन जणू आणखी परिपूर्ण झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी मंदिरातील पुजारी, देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि उपस्थित कोल्हापूरकरांनी पाटील यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
आई अंबाबाई, देश-राज्य आणि सर्व जनतेला सुखी, समृद्धी ठेव. प्रत्येकाला आरोग्य आणि कल्याणाचं वरदान दे. तुझी कृपादृष्टी आणि आशीर्वाद सर्वांना सदैव लाभोत, हीच तुझ्या चरणी प्रार्थना, असे मागणे पाटील यांनी अंबाबाई चरणी मागितले.