पुण्यात ‘स. संतसिंह मोखा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’चे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भव्य उद्घाटन उत्साहात संपन्न

5

पुणे : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात आणखी एका दर्जेदार संस्थेची भर पडली आहे. येथील प्रसिद्ध ‘सरहद नॅशनल स्कूल’ आणि ‘विजय फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘स. संतसिंह मोखा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’ चा भव्य उद्घाटन सोहळा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

या नूतन व्यवस्थापन संस्थेचे उद्घाटन करताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संस्थेच्या या नवीन पाऊलाचे कौतुक केले. आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात व्यावसायिक आणि दर्जेदार व्यवस्थापन शिक्षणाची मोठी गरज आहे. ही संस्था पुणे आणि परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक कॉर्पोरेट जगताचे उत्तम शिक्षण देऊन सक्षम करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याच दिमाखदार सोहळ्याचे दुहेरी औचित्य साधून, विजय फाउंडेशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ समाजसेवक स. संतसिंह मोखा यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स. संतसिंह मोखा यांचे शाल, श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक अभिष्टचिंतन केले. तसेच त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाचा गौरव करत त्यांना सुदृढ उदंड आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

​या महत्त्वपूर्ण प्रसंगी नगरसेविका वर्षाताई तापकीर, अरुण राजवाडे, संदीप बेलदरे, बापू चोरगे, गुरुनानक गुरुद्वारा ट्रस्टचे दिलबगसिंह बीर, चरणजीत सिंह सहानी, सरहद संस्थेचे संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.