कागल तालुक्यात ‘शाहू ठिबक सिंचन योजनेचा’ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळण्याचा विश्वास
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील अग्रणी संस्था असलेल्या ‘श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना’ आणि ‘शाहू राजे को-ऑपरेटिव्ह बँक’ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी हितैषी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत ‘श्री छत्रपती शाहू ठिबक सिंचन योजनेचा’ आणि मागासवर्गीय ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘जैविक निविष्ठा वाटप’ उपक्रमाचा भव्य शुभारंभ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना समृद्धीच्या शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि शाश्वत शेतीला चालना देणारे हे उपक्रम निश्चितच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारे ठरतील, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.
पाटील यावेळी म्हणाले, सध्या एलनिनोच्या पार्श्वभूमीवर कमी पर्जन्यमानाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे ही काळाची गरज आहे. ठिबक सिंचनासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अवलंब करून पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यामुळे शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक होईल. याच अनुषंगाने शेतकरी बांधवांना ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजीतराजे घाटगे, विरेंद्रसिंह राजे घाटगे, अखिलेश राजे घाटगे, व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, कागल पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील, कागल नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांच्यासह कारखाना व बँकेचे पदाधिकारी, संचालक, सभासद आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.