कोल्हापुरात पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित आध्यात्मिक कार्यक्रमास मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती; २० जूनच्या अमित शाह यांच्या सोहळ्याचे दिले निमंत्रण
कोल्हापूर : पुरुषोत्तम (अधिक) मासाचे पावन औचित्य साधून कोल्हापूर येथील पाटीदार सभा, पाटीदार महिला मंडळ आणि पाटीदार सनातन युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली. या प्रसंगी त्यांनी उपस्थित सर्व समाजबांधवांना पुरुषोत्तम मासाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यात देशपातळीवरील प्रख्यात प्रवचनकार पंडित देवकृष्ण वासू यांच्या अमृततुल्य प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रवचनाचा श्रवणानंद घेतला. “भारतीय संस्कृती, सनातन अध्यात्म आणि नैतिक मूल्यांची जपणूक करणारे असे भक्तीमय कार्यक्रम समाजात सकारात्मक ऊर्जा व सलोखा निर्माण करण्याचे मोठे कार्य करतात, याचा मला मनापासून आनंद वाटतो,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
या धार्मिक व्यासपीठावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगामी ऐतिहासिक सोहळ्याची माहिती दिली. येत्या २० जून रोजी कोल्हापूर येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आई अंबाबाई मंदिराच्या विकास कामांचा भव्य लोकार्पण सोहळा होत आहे. या अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक कार्यक्रमास कोल्हापूरकरांनी व पाटीदार समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आग्रहाचे निमंत्रण त्यांनी यावेळी सर्वांना दिले.