कोथरुडच्या वाहतूक समस्यांवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच राहतील – मंत्री चंद्रकांत पाटील

13

पुणे : राजाराम पूल ते म्हात्रे पूल डीपी रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी पादचारी क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल उभारणे, अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करणे तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आठ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश पाटील यांनी यावेळी दिले.

यासोबतच, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा सविस्तर अहवाल एक महिन्याच्या आत सादर करण्याच्या सूचना दिल्या असून, या कामाचा मी स्वतः दर आठवड्याला आढावा घेणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. कोथरुडच्या वाहतूक समस्यांवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी माझे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच राहतील, असे पाटील यांनी सांगितले.

वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी लोकसहभागातून ३० वाहतूक वॉर्डन उपलब्ध करून दिले आहेत. आवश्यकता भासल्यास आणखी २५० वाहतूक वॉर्डन उपलब्ध करून देण्याची तयारीही व्यक्त केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक पुनीत जोशी, पृथ्वीराज सुतार, ॲड. मिताली सावळेकर, राजाभाऊ बराटे, रेश्मा बराटे, तेजश्री पवळे, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, शहर सरचिटणीस सुशील मेंगडे, प्रशांत हरसुले, मंडळ अध्यक्ष गिरीश खत्री, ॲड. प्राची बगाटे, कुलदीप सावळेकर, अनघा जगताप, राजेंद्र येडे, वैभव जमदाडे, बाळासाहेब धनवे, हेमंत भावे, मालन सरवदे, संगीताताई शेवडे, अरुण साकळे, प्रतीक खर्डेकर, निलेश घोडके, शंतनू खिलारे, महापालिका व वाहतूक विभागाचे अधिकारी, भाजपा पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.