वडगाव शेरी येथे १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गौरव
पुणे : विद्यार्थ्यांचे यश हे केवळ त्यांच्या वैयक्तिक परिश्रमांचेच नव्हे, तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे पालक, मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि संपूर्ण समाजाच्या सामूहिक योगदानाचे प्रतीक असते. याच जाणिवा वृद्धिंगत करण्यासाठी ‘पुणे विकास प्रतिष्ठान’ च्या वतीने वडगाव शेरी येथे इयत्ता १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एका विशेष गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या शानदार सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला आणि त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या सोहळ्यात वडगाव शेरी परिसरातील शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांना मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आणि त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा देताना मंत्री पाटील यांनी पालकांच्या आणि शिक्षकांच्या कष्टांचेही विशेष कौतुक केले.
या प्रसंगी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे विकास प्रतिष्ठानने आयोजित केलेला आजचा हा गौरव समारंभ गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी नवी उमेद, प्रेरणा आणि आत्मविश्वास देणारा ठरेल, असा मला दृढ विश्वास आहे. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाची दारे खुली होत असताना देशाच्या प्रगतीत आपले योगदान द्यावे.
या कार्यक्रमाला माजी आमदार जगदीश मुळीक, नगरसेवक योगेश मुळीक यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक तथा गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.