टेमघर येथे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व आर्थिक मदत वाटप; मंत्री चंद्रकांत पाटील आणि श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्टचा स्तुत्य पुढाकार
पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुण्याच्या टेमघर येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा शैक्षणिक व आर्थिक मदत वाटपाचा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, हाच या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना प्रगतीची योग्य संधी व पाठबळ देणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शासन आणि समाज सदैव खंबीरपणे पाठीशी उभा राहील, हाच आमचा निरंतर प्रयत्न आहे.
या अनपेक्षित आणि मोलाच्या मदतीबद्दल उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालकांनी मंत्री चंद्रकांत पाटील व देवस्थान ट्रस्टप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. मदत मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान हेच आम्हांला पुढील सामाजिक कार्यासाठी मोठी प्रेरणा देणारे आहे, असे नमूद करत मंत्री पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक यशासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.