वाचनसंस्कृती बळकट करण्यासाठी ग्रंथालय विभागाच्या कामकाजाला गती देणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथालय विभागाशी संबंधित प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेत प्रलंबित प्रकरणे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीत राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या बळकटीकरणासह वाचनसंस्कृती अधिक व्यापक करण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः फिरते ग्रंथालय सेवा योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत सकारात्मक विचारमंथन झाले. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाची दारे पोहोचविण्यासाठी या योजनेचा सुधारित प्रस्ताव तातडीने तयार करून शासनास सादर करण्याच्या सूचना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, उपसचिव अमोल मुत्याल तसेच विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.