कोथरूडमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त ‘समाजगुरूं’चा सन्मान; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव
पुणे : गुरुपौर्णिमेच्या पावन आणि मंगलमय निमित्ताने कोथरूड मतदारसंघात समाजाला ज्ञान, संस्कार आणि प्रेरणेची दिशा देणाऱ्या ‘समाजगुरूंच्या’ अमूल्य कार्याचा गौरव करण्यात आला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ‘विद्या प्रबोधिनी’ तसेच ‘पुनर्निर्माण सोशल फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान मान्यवरांचा विशेष सन्मान करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या सोहळ्यात कोथरूड आणि पुणे परिसरातील अनेक ज्येष्ठ मार्गदर्शक आणि समाजसेवकांना मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर विद्या प्रबोधिनी आणि पुनर्निर्माण सोशल फाउंडेशनचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या समाजात केवळ वर्गात शिकवणारेच नव्हे, तर आपल्या कर्तृत्वाने समाज घडवणारे अनेक ‘समाजगुरू’ कार्यरत असतात. ज्ञान, निस्वार्थी कर्तृत्व आणि समाजहिताच्या पवित्र भावनेतून कार्य करणाऱ्या या सर्व मान्यवरांचे योगदान आजच्या युवा पिढीसाठी सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या या त्यागमय आणि निरंतर सुरू असलेल्या सेवाकार्याला मनःपूर्वक अभिवादन, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.
यावेळी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ तथा नोबेल पुरस्काराचे सहमानकरी डॉ. राजेंद्र शेंडे, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. भूषण पटवर्धन, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, पुण्यातील पहिले कंपनी सचिव तसेच पुणे सार्वजनिक सभेचे उपाध्यक्ष डॉ. अरविंद नवरे, ज्येष्ठ लेखक-संपादक आनंद हर्डीकर, लेखिका व अनुवादक मृणालिनी सावंत, लेखक-दिग्दर्शक व गायक आनंद माडगूळकर, प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे, इतिहास संशोधक अनुराधा कुलकर्णी तसेच ग्रंथप्रसारक आणि ‘रुरल रिलेशन्स’चे प्रमुख प्रदीप लोखंडे यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला.