सीओईपी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठात मुला-मुलींच्या वसतिगृहांची क्षमता वाढवणार; नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
पुणे :पुण्यातील नामांकित सीओईपी (COEP) टेक्नॉलॉजिकल विद्यापीठातील विद्यार्थ्यांची सातत्याने वाढती संख्या लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या निवासाची उत्तम सोय व्हावी यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सीओईपी विद्यापीठातील मुला-मुलींच्या दोन्ही वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि भविष्यातील शैक्षणिक गरजांचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. विद्यापीठात येणाऱ्या प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला राहण्यासाठी जागा आणि उत्तम शैक्षणिक वातावरण मिळावे, हा या पाहणीचा मुख्य उद्देश होता.

पाहणीनंतर विद्यापीठ प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सीओईपी विद्यापीठाचा नावलौकिक मोठा असल्याने येथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दोन्ही वसतिगृहांची क्षमता वाढविण्याचा सविस्तर आणि सर्वसमावेशक आराखडा तातडीने सादर करावा, असे पाटील यांनी सांगितले.
वसतिगृहांच्या पाहणीसोबतच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सीओईपी परिसरामधून जाणाऱ्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचीही प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रकल्पाच्या कामात येत असलेल्या सर्व प्रलंबित तांत्रिक अडचणी व प्रशासकीय अडथळे तातडीने दूर करून कामाला वेग देण्याच्या कडक सूचना त्यांनी संबंधित उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दिल्या. हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास विद्यापीठ परिसराच्या सौंदर्यात आणि पर्यावरण रक्षणात मोठी भर पडेल, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी सीओईपीचे कुलगुरू डॉ. सुनील भिरुड, सीओईपी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष विनायक पै, कुलसचिव डी. एन. सोनावणे, अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. पराग सदगिर, विद्यार्थी संघटनेचे माजी सदस्य जगदीश कदम, डॉ. राजेंद्र हिरेमठ, भरत गिते, विवेक पवार; तसेच नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे उपअभियंता उमेश शिद्रुक आदी उपस्थित होते.