पुण्यात संत अच्युत महाराज प्रतिष्ठानचा गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बोधचिन्ह व संकेतस्थळाचे लोकार्पण
पुणे : अध्यात्म, संस्कृती आणि समाजप्रबोधनाची समृद्ध परंपरा जपत समाजात सकारात्मक विचार रुजविण्याचे कार्य करणाऱ्या संस्था खऱ्या अर्थाने समाजाचा पाया मजबूत करतात. याच पवित्र भावनेतून पुणे येथे ‘श्री संत अच्युत महाराज सांस्कृतिक प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून दर्शन व सेवेचा लाभ घेतला.
या मंगलमय सोहळ्यादरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिष्ठानच्या अधिकृत बोधचिन्हाचे आणि संकेतस्थळाचे अत्यंत उत्साहात लोकार्पण करण्यात आले. या गुरुपौर्णिमा महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे पूजनीय श्री संत सचिन देव महाराज यांचे सुश्राव्य निरूपण होते. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित भाविकांसोबत बसून महाराजांच्या ज्ञान, अध्यात्म आणि उत्तम संस्कारांनी परिपूर्ण अशा मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, श्री संत अच्युत महाराज सांस्कृतिक प्रतिष्ठान ज्या पद्धतीने अध्यात्म, संस्कृती आणि समाजप्रबोधनाची परंपरा जपत समाजात सकारात्मक विचार रुजविण्याचे कार्य प्रतिष्ठान करत आहे, ही निश्चितच प्रेरणादायी बाब आहे. संस्कृती टिकवण्यासाठी अशा उपक्रमांची मोठी गरज आहे. या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व तरुण कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.