कोथरूडमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी… स्वप्नशिल्प सोसायटीत ‘निसर्गछाया सिनियर सिटिझन क्लब’च्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
पुणे : कोथरूड हे माझ्यासाठी केवळ एक मतदारसंघ नसून माझे विस्तारित कुटुंब आहे. या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि त्यांच्यासाठी समाजोपयोगी उपक्रम राबवणे हे मी माझे कर्तव्य मानतो,” अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. कोथरूडमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘निसर्गछाया सिनियर सिटिझन क्लब’च्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ गुरुवारी स्वप्नशिल्प सोसायटी येथे मंत्री पाटील यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपल्या ज्येष्ठांनी आयुष्यभर कुटुंब, समाज आणि राष्ट्रासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या आयुष्याची ही सुवर्णसंध्या अधिक आनंदी, निरामय, उत्साही आणि सन्मानाने परिपूर्ण व्हावी, तसेच त्यांना संवाद, मैत्री, विरंगुळा आणि सकारात्मक ऊर्जेचे हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशानेच हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा क्लब ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाचे नवे क्षण निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी पाटील यांनी मार्गदर्शन तर केलेच शिवाय कॅरम खेळण्याचा आनंद देखील घेतला.

‘निसर्गछाया सिनियर सिटिझन क्लब’च्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना संवाद आणि सकारात्मक ऊर्जेचे नवे माध्यम मिळणार. कोथरूडकरांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेले प्रेम हीच खरी प्रेरणा असून, प्रत्येक कुटुंबाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची मंत्री पाटील यांनी ग्वाही दिली.
या विशेष कार्यक्रमाला उपक्रम संयोजक मंदार देवगावकर आणि संयोजिका अमृता देवगावकर यांच्यासह स्वप्नशिल्प सोसायटीतील नागरिक व ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.