पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
कोल्हापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इचलकरंजी आणि परिसरातील विविध नामांकित शिक्षण संस्थांचे प्रमुख व पदाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधला. या दोन्ही मतदारसंघांसाठी दर सहा वर्षांनी पूर्णपणे नवीन मतदार यादी तयार केली जात असल्याने, या प्रक्रियेत सुशिक्षित नागरिकांचा सहभाग वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या संवाद बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदार नोंदणी प्रक्रियेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक पात्र मतदाराचे नाव यादीत समाविष्ट व्हावे, यासाठी परिसरातील सर्व शिक्षण संस्थांच्या प्रमुखांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या स्तरावर जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी सक्रिय प्रयत्न करावेत.”
या बैठकीला आमदार राहूल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, कोल्हापूर दक्षिण जिल्हा अध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांच्यासह इचलकरंजी परिसरातील भाजपाचे आणि विविध संस्थांचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.