नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधारित शिक्षणावर भर द्या; बळवंत महाविद्यालयात मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

4

सांगली : सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्याच्या दौऱ्यानिमित्त राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या नामांकित बळवंत महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी महाविद्यालयातील संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून विविध शैक्षणिक विषयांवर सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अंमलबजावणीवर विशेष भर दिला. ते म्हणाले की, “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्याधारित आणि व्यवसायाभिमुख शिक्षणाला सर्वोच्च महत्त्व देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता प्रत्यक्ष उद्योगविश्वाचा अनुभव मिळावा, यासाठी महाविद्यालयाने इंटर्नशिप उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवावेत.

याच सभेमध्ये त्यांनी आगामी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा संदर्भ देत मतदार नोंदणीचे महत्त्व पटवून दिले. विटा तालुक्यातील आणि रयत शिक्षण संस्थेतील सर्व पात्र शिक्षकांनी व पदवीधरांनी या मतदार नोंदणी प्रक्रियेत स्वतःहून सहभागी व्हावे आणि लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नोंदणी करून घ्यावी, असे आवाहनही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.

या प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, विलास काळेबाग, रयत शिक्षण संस्थेचे सल्लागार विलास शिंदे, बळवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोबडे, प्रा. राहुल पाटील यांच्यासह संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.