ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या ९१ व्या वर्षातील पदार्पणानिमित्त ‘आम्रवृक्ष’ जीवनचरित्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भव्य प्रकाशन; मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती
सांगली : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अण्णासाहेब (आप्पा) डांगे यांच्या ९१ व्या वर्षातील पदार्पणानिमित्त सांगली येथे एका विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून डॉ. अण्णासाहेब डांगे यांचे मनापासून अभिष्टचिंतन केले आणि त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित ‘आम्रवृक्ष’ या जीवनचरित्राचे अत्यंत दिमाखात प्रकाशन करण्यात आले. याच कार्यक्रमादरम्यान अण्णासाहेब डांगे औद्योगिक संकुलातील विविध नूतन इमारतींचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाले. या संपूर्ण सोहळ्याला मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, आप्पांनी शिक्षण, समाजसेवा आणि सहकार क्षेत्रात केलेले कार्य अत्यंत मोलाचे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि अमूल्य मार्गदर्शनाचा समाजाला नेहमीच लाभ मिळत राहो, हीच या निमित्ताने ईश्वरचरणी सदिच्छा व्यक्त करतो.
या प्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामजी शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुलजी नार्वेकर, मंत्रीमंडळातील सहकारी शिवेंद्रराजेजी भोसले, जयकुमारजी गोरे यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, महायुतीतील पदाधिकारी आणि आप्पांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.