विटा तालुक्याच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प; आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी मंत्री चंद्रकांत पाटील यांची सदिच्छा भेट
सांगली : सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा घेत लोकप्रतिनिधींशी संवाद साधला.
या प्रसंगी आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी विटा नगर पालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील विविध आजी-माजी लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सर्व लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधत विटा शहर व तालुक्यातील स्थानिक विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि विविध महत्त्वपूर्ण विषयांवर अनौपचारिक व सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विटा तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्धता व्यक्त केली. ते म्हणाले, जनतेच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करणे आणि विटा तालुक्याचा सर्वांगीण विकास साधणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. या संवाद सोहळ्यात विटा तालुक्याच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याचा दृढ संकल्प मान्यवरांनी व्यक्त केला.
या प्रसंगी विटा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, जिल्हा परिषद सदस्या डॉ. शितल बाबर, पंचायत समिती अध्यक्षा सुवर्णा भोसले यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.