मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापूर शहरातील १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न

15

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कोल्हापूर शहरातील १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झाले. कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ करणे गरजेचे असून त्यादृष्टीने हद्दीबाहेरील लोकांच्या अडीअडचणी शंभर टक्के सोडविण्यात येतील, असे सांगून कोल्हापूर शहराला अधिक सुनियोजित करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

वैद्यकीय शिक्षण विभाग, कोल्हापूर महानगरपालिका व महाराष्ट्र पोलीस यांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम प्रायव्हेट हायस्कूलच्या पटांगणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, राहुल आवाडे, शिवाजी पाटील, अशोकराव माने, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, पोलीस अधीक्षक निलोत्पाल, उपमहापौर अक्षय जरग आदी उपस्थित होते.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे संपूर्ण महाराष्ट्राचा मानबिंदू आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या देदिप्यमान नाट्य परंपरेमध्ये या नाट्यगृहाचा फार मोठा इतिहास आहे. १४ ऑगस्ट १९१५ रोजी छत्रपती राजाराम महाराज यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. पूर्वी ‘पॅलेस थिएटर’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या नाट्यगृहाला १९५७ पासून ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह’ म्हणून ओळखले जाऊ लागले. दुर्दैवाने दोन वर्षांपूर्वी या नाट्यगृहाला लागलेल्या आगीप्रसंगी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली आणि कोल्हापूरचे वैभव असलेल्या आणि कोल्हापूरकरांचे प्रचंड प्रेम असलेल्या या नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणासाठी राज्य सरकारने २५ कोटी रुपये तात्काळ दिले. या नाट्यगृहाचे पुनर्निर्माण आधीचेच बाह्यस्वरुप जतन करत वारसामूल्य जपून अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे.

कोल्हापूरमध्ये खऱ्या अर्थाने संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे योगदान कोणी विसरू शकत नाही, असे सांगून फडणवीस म्हणाले, संगीत मानापमान या नाटकामधील बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांच्यातली जुगलबंदी ही मराठी संगीत नाटकाच्या इतिहासातील एक मर्मबंधाची ठेव आहे. संगीतसूर्य भोसले यांच्या नावाच्या नाट्यगृहाने संगीत, शास्त्रीय संगीत, लोकनाट्य, लावणी, पोवाडा, तमाशा, दशावतार अशा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेल्या बाबी पाहिल्या आहेत. या नाट्यगृहाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक त्या बाबी करण्यात येतील. नाट्य चळवळ, रंगभूमी असो किंवा चित्रपट या सर्व बाबींमध्ये कोल्हापूरचे मोठे योगदान नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाबुराव पेंटर, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम यांनी कोल्हापूरला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. पंडित विष्णू पलुसकर, दिगंबर पलुसकर, सुधीर उर्फ बाबुजी फडके, सुरेश वाडकर, वामनराव सडोलीकर असे अनेक दिग्गज गायक हे कोल्हापुरातले. पिराजीराव सरनाईक, अरुण सरनाईक, रमेश देव हे कलावंत याच कोल्हापुरातले. भारताला पहिल्यांदा ऑस्कर मिळवून देणाऱ्या वेशभूषाकार भानू अथय्या यांचीही कर्मभूमी कोल्हापूर शहर राहिली आहे, असे सांगून संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या नावाने असलेल्या या नाट्यगृहाचे पुन्हा एकदा नवनिर्मित रूपात उद्घाटन होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

आपल्यासाठी २४ तास काम करणाऱ्या पोलीसांसाठी चांगल्या प्रकारची घरे असावित ही भूमिका घेऊन राज्य सरकार काम करत असून महाराष्ट्रामध्ये पोलिसांकरता ५० हजार घरांचे नियोजन केले आहे. कोल्हापूर येथील पोलीसांसाठी घराची १७ मजली सुंदर इमारत तयार झाली आहे. जवळपास २०४ सदनिका महाराणी ताराराणी पोलीस गृहसंकुलात तर इचलकरंजीमध्ये २१० सदनिका अशा जवळपास ४१४ सदनिका पोलिसांकरता आज या जिल्ह्यामध्ये आपण उपलब्ध करून दिल्या आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, कोल्हापूर हे कुस्तीचे माहेरघर आहे. मात्र, फुटबॉल, हॉकी आणि क्रिकेट खेळाचे प्रेमीही येथे आहेत. त्यामुळे केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेतून व महानगरपालिकेच्या निधीतून 6 कोटी 96 लाख रुपयातून मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऍस्ट्रोटर्फ मैदान विकसित केले आहे. राज्य व आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील हॉकीच्या स्पर्धा कोल्हापुरात घेता येईल. तसेच कोल्हापूरला क्रिकेटचे स्टेडियम बांधण्याकरता जागा उपलब्ध करून दिली आहे. स्टेडियमसाठी बीसीसीआयला विनंती केली असून त्या माध्यमातून देशातील आधुनिक अशा प्रकारचे उत्तम दर्जाचे क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येईल. फुटबॉल खेळासाठीही आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील.

कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या पुरामुळे लोकांचा आक्रोश आणि नुकसान आम्ही पाहिला असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यावर मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या साह्याने पुराच्या पाण्यावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र रेझिलिएन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) तयार केला. यापूर्वी रखडलेल्या या प्रकल्पाला पुन्हा या सरकारने ‘मित्रा’च्या (महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन) माध्यमातून मान्यता मिळवली असून केवळ कोल्हापूर आणि सांगली शहरच नव्हे तर या भागातील संपूर्ण पाणलोट क्षेत्रावर पूरनियंत्रणाच्या दृष्टीने काम करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत पुराचे वाहून जाणारे अतिरिक्त पाण्यापैकी सुमारे ३५ ते ४० टीएमसी पाणी आता डायव्हर्शन कॅनलने पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांना आणि पुढे उजनी धरणात आणि पुढे मराठवाड्यामध्ये नेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे समाधी स्थळ, मेजर ध्यानचंद स्टेडियमवर एस्ट्रोटर्फ, रंकाळा तलावतील संगीत कारंजे, अंबाबाई मंदिर परिसरात बहुमजली पार्किंग, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प एमआरडीपी अंतर्गत ४८४ कोटींचे रस्ते व नागरी सुविधा, मेकॅनिकल पार्किंग यासह विविध कामांचे लोकार्पणही या कार्यक्रमांमध्ये झाले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनातून जिल्ह्याला नवी दिशा व सांस्कृतिक, क्रीडा, पर्यटन व नागरिक सुविधांना बळकटी मिळेल. सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कला वैभवाची समृद्ध परंपरा असलेल्या करवीर नगरीतील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणीमुळे अमूल्य सांस्कृतिक ठेव्याचे नव्याने जतन संवर्धन आणि पुनरुज्जीवन होत आहे. हा क्षण सर्वांसाठी अभिमानाचा आणि समाधानाचा आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले 136 व्या जयंतीनिमित्त हे नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभे राहिले आहे. हा क्षण केवळ पुनर्बांधणीचाच क्षण नाही तर हा महाराष्ट्र आणि कोल्हापूरच्या समृद्धीचा पुनर्जन्म सोहळा आहे.

उपमुख्यमंत्री म्हणाल्या, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कला, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रेमी दूरदृष्टीचे हे नाट्यगृह मूर्तिमंत प्रतीक आहे. नाट्यगृह पूर्वीच्या दिमाखदार ऐतिहासिक स्वरूपात जपणे, या वैभवाची निगा राखणे तसेच याचे सौंदर्य अबाधित ठेवणे, हे कोल्हापूर वासियांसाची सामाजिक जबाबदारी आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी मराठी संगीत नाट्यपरंपरेसाठी दिलेले योगदान अनमोल आहे त्यांच्या नावाने ओळखले जाणारे हे नाट्यगृह पुढील अनेक पिढ्यांसाठी कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेचे प्रेरणास्थान राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.