‘आभा महाराष्ट्र’ हे एक प्रमुख ज्ञानकेंद्र म्हणून उदयास येईल आणि यातील अभ्यासक्रम भारतीय तत्त्वज्ञानाच्या प्रचार व प्रसारास मोठी मदत करेल – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पुणे येथील डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर आणि संशोधन इन्स्टिट्यूट अभिमत विद्यापीठाच्या ८७ व्या पुनर्स्थापना दिनानिमित्त मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, गौरवशाली ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या संस्थेने विविध क्षेत्रांचा सखोल अभ्यास एकत्र आणून भारतीय ज्ञान परंपरेची पुनर्स्थापना केली आहे. ही समृद्ध परंपरा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेकडून मोठ्या संशोधनाची अपेक्षा आहे.
याप्रसंगी ‘आभा महाराष्ट्र’ या नवीन केंद्राची घोषणा करण्यात आली. हे एक प्रमुख ज्ञानकेंद्र म्हणून उदयास येईल आणि यातील अभ्यासक्रम भारतीय तत्त्वज्ञानाच्या प्रचार व प्रसारास मोठी मदत करेल, असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी संस्थेचे कुलपती प्रा. भूषण पटवर्धन, प्रभारी कुलगुरू प्रसाद जोशी, प्रभारी कुलसचिव अभिजीत दांडेकर, डॉ. गो.बं. देगलूरकर आणि डॉ. नितीन करमळकर यांच्यासह संस्थेचे सभासद व विद्यार्थी उपस्थित होते.