कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमध्ये संवाद वाढणे गरजेचे – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पुणे येथील एनएक्सपी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन कंपनीचे संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी पाटील म्हणाले, मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. सेमीकंडक्टरच्या या युगात आपल्या अभियंत्यांचे कार्य उल्लेखनीय असून, संस्थेने संशोधन क्षेत्रातील घोडदौड अशीच कायम ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमध्ये संवाद वाढणे गरजेचे आहे. यासाठी संस्थेने अभियांत्रिकी महाविद्यालयांशी समन्वय साधावा, ज्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा व प्रेरणा मिळेल, असे आवाहन देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
यावेळी आशिष भट्टड, वृषाली मोदी, डॉ. संदीप बुटाला यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.