अभिजात भाषेचा दर्जा हा केवळ सन्मान नसून मराठीच्या संवर्धनाची आणि दैनंदिन जीवनात तिचा अधिकाधिक वापर करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सप्ताहाचा शुभारंभ केला. मराठीच्या संवर्धनासाठी पुण्यात डेक्कन कॉलेज येथे उत्कृष्टता केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच अमरावतीच्या रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाची उभारणी होत आहे. उच्च व तंत्रशिक्षणातील पुस्तके मराठीत उपलब्ध करून देण्याचे कामही आपण पुढे नेत आहोत, असे प्रतिपादन यावेळी पाटील यांनी केले.
मंत्री पाटील यांनी १४८ वर्षांनंतर पुण्यात १००वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या ऐतिहासिक संमेलनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व विद्यापीठांनी युवा संमेलन आणि नांदी संमेलन आयोजित करावे, असा आग्रह देखील यावेळी व्यक्त केला.
अभिजात भाषेचा दर्जा हा केवळ सन्मान नसून मराठीच्या संवर्धनाची आणि दैनंदिन जीवनात तिचा अधिकाधिक वापर करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. त्यामुळे व्यवहारात, शिक्षणात आणि सार्वजनिक जीवनात मराठीचा अभिमानाने वापर करण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहन मंत्री पाटील यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, शामकांत देवरे, अरुण गीते, प्र-कुलगुरू पराग काळकर, माजी कुलगुरू नितीन करमळकर, सचिव प्रफुल्ल पवार यांच्यासह मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.