नाना, तुमचा असा अचानक निरोप मनाला चटका लावून गेला… भावपूर्ण श्रद्धांजली! – मंत्री चंद्रकांत पाटील

2

पुणे : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गोव्यातील डोना पाऊला येथील निवासस्थानी आज पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी त्यांना हृदयविकाराचा (कार्डियाक अरेस्ट) तीव्र झटका आला. त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले, मात्र सलग ४५ मिनिटे सीपीआर (CPR) देऊनही डॉक्टरांना त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. या बातमीने देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. माझे अत्यंत स्नेही नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला सुन्न करून गेली. वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला, यावर अजूनही विश्वास बसत नाही, असे मंत्री पाटील यांनी म्हटले.

पाटील यांनी आपल्या सोशल साईट्सवर श्रद्धांजली अर्पण करताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले, अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर पुण्यातील त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांची झालेली भेट, तो आपुलकीचा संवाद आणि नेहमीप्रमाणे झालेली मनमोकळी चर्चा आजही जशीच्या तशी माझ्या डोळ्यांसमोर आहे. त्या भेटीतली त्यांची ऊर्जा आणि जिवाभावाचा सहवास पाहून कोणाला वाटलंही नसेल की ही आपली शेवटची भेट ठरेल… आज ही बातमी ऐकताना त्या भेटीच्या आणि संवादांच्या आठवणींचा पट मनात दाटून येत आहे.

मराठी रंगभूमीपासून हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अफाट अभिनयाने, खणखणीत संवादफेकीने आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाने नानांनी प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. ‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’, ‘अग्निसाक्षी’ आणि ‘खामोशी’ अशा एकापेक्षा एक सरस भूमिकांमधून त्यांनी अभिनयाचा नवा मानदंड निर्माण केला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पद्मश्री सन्मानाने त्यांच्या महान कलाप्रतिभेचा गौरव झाला, तरीही त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच राहिले.

माझा आणि नानांचा स्नेह जुना आणि जिव्हाळ्याचा होता. त्यांच्या कडक आणि स्पष्टवक्त्या स्वभावामागे एक अत्यंत हळवं, संवेदनशील आणि माणसांवर मनापासून प्रेम करणारं हृदय होतं. ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी आणि गरजूंसाठी त्यांनी उभारलेले सामाजिक कार्य असो किंवा सामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची वृत्ती, नाना नेहमीच एका संवेदनशील माणसाच्या भूमिकेत जगले.

आज मी केवळ एक महान कलावंत गमावला नाही, तर माझ्या मनाच्या जवळचा एक आपुलकीचा सोबती गमावला आहे. नानांचे जाणे ही भारतीय कलाक्षेत्राची, समाजकारणाची आणि आपल्या सर्वांचीच कधीही भरून न निघणारी हानी आहे. नाना, तुम्ही साकारलेल्या अजरामर भूमिका आणि तुमच्या आठवणी मनात सदैव जिवंत राहतील. कलासृष्टीच्या या खऱ्या ‘नटसम्राटाला’ माझी भावपूर्ण श्रद्धांजली!… अशा भावना मंत्री पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

नाना पाटेकर यांनी ‘गमन’ (१९७८) चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’, ‘प्रहार’, ‘अंकुश’ आणि मराठीतील ‘नटसम्राट’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधील त्यांच्या उत्कृष्ट भूमिका आणि संवादफेक कायम स्मरणात राहील. केवळ अभिनयच नव्हे, तर नाम फाउंडेशनच्या (Naam Foundation) माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केलेले सामाजिक कार्य नेहमीच मार्गदर्शक ठरेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.