वारजे-माळवाडी येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘सेवा धाम’चे भव्य लोकार्पण; नगरसेविका हर्षदा भोसले यांच्या लोककल्याणकारी उपक्रमाचे कौतुक

15

पुणे, ०१ नोव्हेंबर : वारजे-माळवाडी परिसरातील नागरिकांना सर्व आवश्यक नागरी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांच्या दैनंदिन गरजा अधिक सुलभ व्हाव्यात, या उद्देशाने प्रभाग क्रमांक ३२ मध्ये उभारण्यात आलेल्या भव्य ‘सेवा धाम’ या वास्तूचा लोकार्पण सोहळा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. नगरसेविका हर्षदा भोसले यांच्या स्थानिक विकास निधीतून या स्तुत्य उपक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.

लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नगरसेविका हर्षदा भोसले यांच्या कार्यपद्धतीचे आणि सेवाभावी वृत्तीचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, “नागरिकांच्या रोजच्या अडीअडचणी आणि नागरी कामांसाठी एकाच ठिकाणी हक्काचे व्यासपीठ देणारा हा उपक्रम संपूर्ण प्रभागासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.” या महत्त्वपूर्ण लोककल्याणकारी कामाबद्दल त्यांनी हर्षदा भोसले यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या दिमाखदार सोहळ्याप्रसंगी खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, रोहिणी भोसले, वासुदेव भोसले, गणेश वरपे, नगरसेवक रविंद्र साळेगावकर आणि केतन धोंडे यांच्यासह परिसरातील अनेक सामाजिक-राजकीय क्षेत्रातील मान्यवर, भाजप-महायुतीचे पदाधिकारी आणि प्रभाग क्रमांक ३२ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.