मोदी सरकारचा निषेध करत नागपुरात सोनू सूद याच्या समर्थानात आम आदमी पार्टी मैदानात
नागपूर: अभिनेता सोनू सूद याच्या समर्थानात आम आदमी पार्टीने नागपुरात आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. सोनू सूद याच्या घरी आणि कार्यालयावर आयकर विभागाने धाडी टाकत कारवाई सुरू केली आहे. त्याविरोधात हे आंदोलन करण्यात आलं.
आंदोलनकर्ते कार्यकर्ते म्हणाले की, सोनू सूद याने कोरोना काळात चांगलं काम केलं, युवकांसाठी तो काम करत असतो. असं असूनही सोनू सूद हा आम आदमी पक्षाचा मेंटर झाल्यामुळे सूडबुद्धीने त्याच्याविरोधात ही कारवाई केली जात आहे. ही कारवाई बंद केली नाही तर मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आप कार्यकर्त्यांनी दिला आहे.
बिहारमध्ये दोन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अचानक 960 कोटी रुपये जमा झाल्याच्या प्रकरणानंतर बराच गदारोळ झाला होता. बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील आजमनगरमधील पास्टिया गावातील दोन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये अचानक 960 कोटी रुपये जमा झाले. गुरुचरण विश्वास आणि असित कुमार 15 सप्टेंबर रोजी त्यांच्या इंडसइंड बँक खात्याची तपासणी करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना याची माहिती मिळाली. त्याचवेळी आयकर विभागाने शेकडो किलोमीटर अंतरावरील मुंबईतील अभिनेता सोनू सूदच्या घरावर छापा टाकला होता.
बिहारच्या कटिहारमध्ये राहणारे दोन विद्यार्थी जेव्हा इंडसइंड बँकेच्या लोकसेवा केंद्रात गेले आणि त्यांची खाती तपासली, तेव्हा त्यांना आढळले की स्पाइस मनी कंपनीच्या पोर्टलचा वापर त्यांच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी केला जात आहे. अभिनेता सोनू सूद या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या कंपनीत सोनू सूदची मोठी भूमिका आहे. म्हणूनच प्रश्न निर्माण झाला आहे की, सोनू सूदचा मुंबईपासून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या कटिहारच्या बँक खात्याच्या व्यवहाराशी काही संबंध आहे का? या संपूर्ण प्रकरणात जिल्हा दंडाधिकारी उदयन मिश्रा यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.