सरकारचा मोठा निर्णय: राज्यात हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत, तर दुकाने रात्री 11 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. तिसऱ्या लाटेची भीती काही प्रमाणात आहे मात्र लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्याने अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. 22 ऑक्टोबरपासून राज्यातील थिएटर्स आणि नाट्यगृहं उघडणार आहेत. अशात सोमवारी झालेल्या बैठकीत हॉटेल आणि रेस्तराँ यांच्या वेळा वाढवण्याचाही निर्णय झाला आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून हॉटेल आणि रेस्तराँ यांच्या वेळा वाढवण्यात आल्याची नियमावली जाहीर कऱण्यात आली आहे. राज्यातील उपहारगृहं, हॉटेल्स आता रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसंच सर्व प्रकारची दुकानं रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यापारी वर्गाच्या दृष्टीने आणि हॉटेल व्यावसायिकांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे.

असे आहेत नियम

उपाहारगृहे (रेस्तराँ) यांना त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत मान्यता.

खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाहसोहळे आहेत, त्याला जास्तीत जास्त 200 संख्येची परवानगी

हॉलमध्ये जी आसन क्षमता असते, त्यामध्ये 50 टक्के परवानगी देण्यात आलेली आहे किंवा 100 या पेक्षा जास्त नाही

कोव्हिड प्रोटोकॉल पाळणं हे मात्र बंधनकारक.

हॉटेलच्या मालकांनी, कर्मचाऱ्यांनी आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांनी कोव्हिड प्रोटोकॉल पाळलाच पाहिजे

हॉटेलमध्ये वेटर्सनीही मास्क घालणं बंधनकारक.

वेटिंग असेल तर वेटिंगवर असलेल्या लोकांनीही मास्क घालणं आणि कोव्हिडच्या सगळ्या निर्बंधांचं पालन करणं आवश्यक.

कोव्हिड प्रोटोकॉलची जबाबदारी मालकांची असणार आहे.