सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

मुंबई: शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या आंदोलनानंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचे वातावरण होते. आंदोलने आजही सुरूच आहेत. सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्याचे यात नाहक बळी गेले. पण अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना त्रिवार वंदन. या आंदोलनात प्राणास मुकलेल्या वीरांना नम्र अभिवादन, असेही मुख्यमंत्री ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

असो, आता सरकारला उपरती झाली. हे कायदे मागं घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्तानं केली, त्याचं मी प्रथम तर स्वागत करतो. केंद्राने असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटनांना विश्वासात घेऊन देशहिताचा निर्णय घ्यायला हवे म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असे होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रिया लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!