बैल कितना भी अड़ियल क्यों न हो, किसान अपना खेत जुतवा ही लेता है – संजय राऊत

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित केलं. मोदी काल काय बोलणार याकडे सर्व देशाचं लक्ष होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संभाषणात मोठी घोषणा करत वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याचे सांगितले. या घोषणेनंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदींना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

बैल कितना भी अड़ियल क्यों न हो, किसान अपना खेत जुतवा ही लेता है जय जवान जय किसान!! असे खोचक ट्वीट करत संजय राऊत यांनी मोदींना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. तसेच राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातूनही मोदींवर निशाना साधला आहे.

लखीमपूर खिरी इथं आंदोलक शेतकऱ्यांना भाजपच्या मंत्रिपुत्रानं चिरडून मारलं. त्या ‘जालियनवाला बाग’सारख्या हत्याकांडाविरुद्ध सार्वत्रिक बंद पुकारणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं. न्याय, सत्य आणि राष्ट्रवादाच्या लढाईत महाराष्ट्रानं नेहमीच निर्भय भूमिका घेतली. यापुढेही अशी भूमिका घ्यावीच लागेल,’ असंही शिवसेनेनं नमूद केलं आहे.

आज मात्र ‘शेतकरी मरू द्या, आजन्म आंदोलन करू द्या, पण सरकार एक पाऊलही मागे हटणार नाही,’ या आडमुठेपणाचा त्याग करून सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. त्यासाठी ५५० शेतकऱ्यांनी बलिदान दिले, दीड वर्ष ऊन-वारा-थंडी-पावसात ते रस्त्यावर लढत राहिले. हे शेतकरी मागे हटणार नाहीत व उत्तर प्रदेश, पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल या भीतीने मोदी सरकारने आता कृषी कायदे मागे घेतले. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे. देशात मनमानी चालणार नाही, ‘हम करेसो कायदा’ हे तर त्याहून चालणार नाही. अशी भूमिका संजय राऊत यांनी सामनातून मांडली आहे.