सहकार क्षेत्राच्या विकासाकरिता सर्व विजयी उमेदवार उत्तमरित्या काम करतील, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्या विजेची नोंद सत्तारूढ गटाने केली आहे. सत्तारूढ गटाचे आमदार महादेवराव महाडिक यांनी संस्था गटातून विजय मिळवला आहे. उत्पादक गटातील मतमोजणी मध्ये महाडिक गटाच्या उमेदवारांनी मोठे मताधिक्य घेतले आहे. या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हटले आहे कि, श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत छत्रपती राजश्री शाहू सहकार आघाडी पॅनलचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले याबाबदल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! सहकार क्षेत्राच्या विकासाकरिता सर्व विजयी उमेदवार उत्तमरित्या काम करतील, असा मला विश्वास असल्याचे पाटील यांनीआपल्या ट्विट मध्ये नमूद केले आहे.

राजाराम कारखान्याची निवडणूक महादेवराव महाडिक यांनी संस्था गटातून लढवली होती. त्यांनी विरोधी गटाचे नेते सतेज पाटील यांच्या समर्थकाचा ३९ मताच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. मतदानादिवशी महाडिक यांनी ९० संस्था प्रतिनिधींचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता तर सतेज पाटील यांनी ७५ संस्था प्रतिनिधी असल्याचे सांगितले होते.